उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेने नेहमीच भावनिक मुद्यांवर राजकारण केलं. महापालिका असो वा राज्यातील राजकारण, हे शिवसेनेने नेहमीच भावनिक मुद्यांवर केलेलं आहे. म्हणूनच बाळासाहेबांनंतर शिवसेना हाताळणं हे एक मोठं आव्हान होतं आणि हे उद्धव ठाकरे यांनी यशस्वीरित्या पेलल्याचं राजकीय समीक्षक म्हणतात. २०१४ साली भाजपने शेवटच्या क्षणी युती तोडली आणि नंतर उद्धव ठाकरेंनी पाच पक्षांशी एकट्याच्या बळावर टक्कर दिली आणि ६३ आमदार निवडून आणले. ही गोष्ट सोपी नव्हती. बाळासाहेबांचा करिश्मा आणि बाळासाहेबांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक हे मुद्दे यात होतेच. पण भाजपने आपल्याशी युती तोडून दगाबाजी केली हा सल मराठी माणसाच्या मनात होता. पण हे यश उद्धव ठाकरेंचे एकट्याचे होते. कारण त्यांच्या सोबत त्यावेळी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची फौज नव्हती. मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी यांच्यासारख्या बाळासाहेबांच्या सोबत असणार्या नेत्यांपैकी एकही तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत नव्हता आणि ही उद्धव ठाकरेंची खरी कसोटी होती.
|||संपादकीय एकट्याच्या बळावर ...